रतन टाटा हे नाव घेतलं की आपल्या मनात एक द्रष्टा नेता आणि आदर्श माणूस डोळ्यांसमोर येतो. टाटा समूहाच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे प्रचंड यश मिळवलं, ते फक्त आर्थिकदृष्ट्या नव्हे तर समाजसेवेच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं होतं. त्यांनी घेतलेले निर्णय फक्त व्यावसायिक नफ्याच्या विचारांनी प्रेरित नव्हते; त्यामध्ये माणुसकी, नीतिमत्ता, आणि सामाजिक बांधिलकीचा देखील विचार होता. रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योजक म्हणून नव्हे, तर एक अत्यंत संवेदनशील माणूस म्हणून सदैव स्मरणात राहतील. गिरीश कुबेर यांच्या टाटायन या पुस्तकात टाटा कुटुंबाची कहाणी फक्त एका कुटुंबाची नसून देश उभरणीची आहे हे आपण वाचलंच असेल, नसेल तर सर्वानी नक्की वाचवं.
रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता, त्यामुळे त्यांचं बालपण काहीसं एकाकी आणि कठीण होतं. मात्र, त्यांच्यावर त्यांच्या आजोबांचा म्हणजेच जे. आर. डी. टाटांचा प्रभाव खूप मोठा होता. हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि कॉर्नेल विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून त्यांनी टाटा समूहात प्रवेश केला.
रतन टाटा यांचा उद्योजकीय प्रवास १९९१ मध्ये सुरू झाला, जेव्हा त्यांनी टाटा समूहाचं नेतृत्व स्वीकारलं. त्यांच्या नेतृत्वाखाली, समूहाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अभूतपूर्व प्रगती केली. एके काळी टाटा मोटर्सने ब्रिटनच्या प्रतिष्ठित जॅग्वार लँड रोव्हर (JLR) या कंपनीचा अधिग्रहण केला. या निर्णयाने अनेकांना आश्चर्य वाटलं, परंतु रतन टाटा यांच्या दूरदृष्टीमुळे JLR ला पुन्हा नवीन उर्जेने कार्यरत केलं.
टाटा नॅनो: स्वप्नातली कार
टाटा नॅनो ही भारतातील कार उद्योगातील एक ऐतिहासिक क्रांती होती. रतन टाटा यांनी मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबांसाठी एक स्वस्त आणि परवडणारी कार निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ज्यामुळे नॅनोचा जन्म झाला. २००८ मध्ये लाँच झालेली नॅनो, जगातील सर्वात कमी किमतीची कार म्हणून ओळखली जाते.
रतन टाटा यांचा टाटा नॅनोबद्दल हेतू फक्त एक स्वस्त कार बनवण्याचा नव्हता, तर सर्वसामान्य लोकांना कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करता यावं, हा होता. भारतातील कुटुंबांसाठी दोनचाकी वाहन ही एकमेव स्वस्त प्रवासाची साधनं होती. मात्र, नॅनोने चारचाकी वाहन खरेदी करणं या कुटुंबांसाठी शक्य केलं.
नॅनोची किंमत अंदाजे 1 लाख रुपयांपासून सुरू झाली होती, जी एका मोठ्या मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबासाठी परवडणारी होती. कारमध्ये चार लोक बसू शकतील अशी जागा होती, सोयीस्कर डिझाइन, आणि शहरांमध्ये सहज चालवता येईल असा छोटा आकार होता.
परंतु नॅनोला बाजारात अपेक्षित यश मिळालं नाही. ग्राहकांच्या दृष्टीने कमी किंमत आणि साधेपणा हे गुणवत्तेच्या बाबतीत समजुतीत बसलं नाही. तसेच, काही तांत्रिक अडचणी आणि खराब मार्केटिंगमुळे नॅनोचं उत्पादन काही वर्षांत थांबवावं लागलं.
जरी नॅनो व्यावसायिक दृष्टिकोनातून पूर्णपणे यशस्वी झाली नाही, तरीही ती एक ऐतिहासिक क्रांती होती, ज्यामुळे अनेक भारतीय कुटुंबांची चारचाकी वाहन घेण्याची स्वप्नं साकार झाली. रतन टाटा यांच्या दूरदृष्टीमुळे नॅनो नेहमीच भारतीय कार उद्योगाच्या इतिहासात एक आदर्श उदाहरण म्हणून ओळखली जाईल. नॅनो कार बाजारात आल्यावर ती केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात चर्चेचा विषय बनली.
संकटप्रसंगी नेतृत्व
२००८ च्या २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यांमध्ये टाटा समूहाच्या ताज हॉटेलवर हल्ला झाला होता. त्या कठीण प्रसंगी रतन टाटा यांनी दाखवलेली सहृदयता आणि संवेदनशीलता लक्षात ठेवावी अशी आहे. त्यांनी हॉटेल ताजमधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली, त्यांना भावनिक आधार दिला आणि त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली. इतकंच नाही, तर त्या घटनेत पीडित झालेल्या सामान्य मुंबईकरांच्या मदतीसाठी टाटा समूहाने मोठं योगदान दिलं. त्यांच्या शब्दांत, माझ्या योग्य निर्णय घेण्यावर विश्वास नाही, मी निर्णय घेतो आणि ते सार्थक ठरवतो, हे त्यांच्या धैर्यशील नेतृत्वाचं प्रतीक आहे.
रतन टाटा यांनी भारतीय उद्योगाला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी २००० साली टेटली टी या ब्रिटनमधील जगप्रसिद्ध चहाच्या ब्रँडचं अधिग्रहण केलं. हा एक ऐतिहासिक निर्णय होता, कारण ब्रिटिशांनी जेव्हा भारतीयांना चहाची ओळख करून दिली होती, तेव्हा त्याच ब्रिटिशांच्या कंपनीचा ताबा एका भारतीय उद्योगपतीने घेतला. ही केवळ व्यावसायिक यशाची गोष्ट नव्हती, तर त्यांनी भारतीयांची ताकद दाखवून दिली.
रतन टाटा यांचं नेतृत्व म्हणजे नीतिमत्ता, माणुसकी, आणि दूरदृष्टी यांचा सुंदर संगम होता. त्यांच्या जीवनातून आपल्याला खूप काही शिकता येईल त्यापैकी काही महत्त्वाचे धडे आपल्याला घेता येतील आणि आपलं आयुष्य यशस्वी बनवता येईल.
- नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणा: रतन टाटा यांनी नेहमी प्रामाणिकपणाचं महत्त्व ठेवलं. त्यांनी कधीही नैतिकतेशी तडजोड केली नाही. ते म्हणत, तो दिवस माझ्यासाठी दुःखाचा असेल ज्या दिवशी मला इतरांसाठी काहीतरी भरीव करता येणार नाही.
- सामाजिक दायित्व: समाजातील गरजू आणि दुर्बल लोकांच्या मदतीसाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला. टाटा ट्रस्ट्सच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य, शिक्षण, आणि ग्रामीण विकासासाठी योगदान दिलं.
- संकटांवर मात करण्याची क्षमता: रतन टाटा यांनी आपल्या धैर्यशील नेतृत्वाच्या माध्यमातून 26/11 च्या मुंबई हल्ल्यासारख्या कठीण प्रसंगांवर मात केली. त्यांच्या धैर्यशील निर्णयक्षमतेमुळे समूहानं या संकटातून उभारी घेतली.
- नवीन प्रयोगशीलता: रतन टाटा यांनी नेहमीच नवीन क्षेत्रांत पाऊल टाकण्याची तयारी ठेवली. त्यांनी टाटा समूहाच्या विविध शाखांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उभारलं. मिठापासून ते सेमी कंडक्टर पर्यन्त जवळजवळ सर्वच क्षेत्रात निर्मिती आणि गुणवत्ता राखण्यासाठी खूप यशस्वी प्रयत्न केले.
- दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता: टाटा नॅनोची निर्मिती ही त्यांच्या दूरदृष्टीची जिवंत उदाहरणं आहे. लोकांनी तुमच्या दिशेने भिरकवलेले दगड घ्या आणि त्यापासून भव्य स्मारक बनवा, हे त्यांचं शब्दसुमन त्यांच्या दृढनिश्चयाचं प्रतीक आहे.
- कर्मचाऱ्यांची काळजी: टाटा समूहातील कर्मचाऱ्यांबद्दल रतन टाटा यांची विशेष आस्था होती. त्यांनी नेहमीच कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या आणि संकटाच्या वेळी त्यांची काळजी घेतली.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपाला आणणं: रतन टाटा यांनी जॅग्वार लँड रोव्हर आणि टेटली टी सारख्या कंपन्या विकत घेऊन भारतीय उद्योगजगताला जगभरात ओळख दिली.
- मानवतेचा आदर: व्यवसायात यश मिळवल्यानंतरही त्यांनी कधीही मानवतेचा विसर पडू दिला नाही. त्यांच्या सामाजिक उपक्रमांनी ते एक संवेदनशील नेता म्हणून ओळखले गेले.
- संकल्प आणि समर्पण: रतन टाटा यांनी प्रत्येक गोष्ट संकल्पपूर्वक आणि समर्पणाने केली. भारताच्या उज्वल भवितव्याबद्दल माझ्या मनात प्रचंड विश्वास आणि उत्साह आहे. माझ्या मते आपल्या महान देशात प्रचंड अव्यक्त ताकत आहे, असं ते नेहमी म्हणायचे.
- विनम्रता आणि माणुसकी: इतकं यश मिळवूनही रतन टाटा कायम साधेपणात राहिले. त्यांची विनम्रता आणि माणुसकी हे त्यांचं खरं वैशिष्ट्य आहे.
रतन टाटा यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहून घेतलं. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, पाणीपुरवठा, आरोग्य आणि ग्रामीण विकासासाठी मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या दातृत्वाची आणि सामाजिक जबाबदारीची भावना त्यांच्या प्रत्येक कार्यात दिसून आली.
रतन टाटा हे आजही आपल्यासमोर एक प्रेरणादायी आदर्श आहेत. त्यांची दूरदृष्टी, नीतिमत्ता, आणि माणुसकीचा विचार करणारी नेतृत्वशैली उद्योजकांपासून ते सामान्य माणसापर्यंत सर्वांनाच प्रेरणा देते. ते केवळ एक उद्योजक नव्हते, तर एका महान माणसाचा आदर्श होते.
डॉ. विश्वनाथ बिटे
सहाय्यक प्राध्यापक,
इंग्रजी विभाग,
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती