यावर्षीचा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार नोबेल १० ऑक्टोबर रोजी दुपारी जाहीर झाला. जगभरातील साहित्यप्रेमी दरवर्षी या क्षणाची वाट पाहत असतात. यावर्षीचा पुरस्कार हॅन कांग, दक्षिण कोरियाची लेखिका यांना जाहीर करत असताना त्यांच्याबद्दल रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या ‘विपुल काव्यात्मक गद्य लेखणासाठी’ त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. त्यांच्या लेखनात मानवी जीवनातील नाजूकता, हिंसा, आघात, आणि अस्तित्वाच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास मांडला आहे. हान कांग यांच्या गद्य लिखानात प्रामुख्याने ऐतिहासिक आघात आणि मानवी जीवनाच्या नाजूकपणावर प्रकाश टाकल्याचे पाहायळा मिळतो. त्यांची साहित्यिक कारकीर्द दक्षिण कोरियाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटनांशी जोडलेली आहे, विशेषत: १९८० सालच्या ग्वांगजू उठावाशी.
हॅन कांग यांनी आपल्या लेखनातून केवळ व्यक्तिगत अनुभवच नाही तर दक्षिण कोरियातील राजकीय आणि सामाजिक आघातांचे चित्रण केले आहे. त्यांच्या लेखनशैलीतील भावनिक खोलपणा, तसेच मानवी आयुष्यातील दुःख आणि हिंसेबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन यामुळे त्यांना जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली आहे.
हॅन कांग यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात १९९० च्या दशकात कवितांपासून केली. त्यांची पहिली कादंबरी रेड अँकर (१९९४) प्रकाशित झाली, ज्यात समाजातील अपेक्षांमुळे निर्माण होणाऱ्या ताणांचा अंतर्भाव केला गेला आहे. त्यांच्या प्रारंभिक लिखाणात व्यक्तिमत्त्वाच्या कोरीव घडणीची सुरुवात दिसून येते, जरी या कादंबरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर तितकीशी प्रसिद्धी मिळवली नाही.
हॅन कांग यांचे प्रमुख साहित्य
1. द वेजिटेरियन (२००७)
हॅन कांग यांच्या या कादंबरीने त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. द वेजिटेरियन ही तीन भागांची कादंबरी आहे, ज्यात नायिका योंगहाय अचानक मांसाहार सोडण्याचा निर्णय घेते. तिच्या या निर्णयामुळे तिच्या आयुष्यात मोठे बदल होतात आणि तिच्या कुटुंबासह समाजाशी तिचा संघर्ष सुरू होतो. या कादंबरीत वैयक्तिक स्वातंत्र्य, मानसिक आरोग्य, आणि समाजाचे दबाव यांचे प्रतीकात्मक चित्रण आहे. योंगहाय च्या माध्यमातून समाजातील रूढीविरुद्ध उठावाचे प्रतीक दर्शविले आहे. द वेजिटेरियन ला २०१६ मध्ये मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हॅन कांग यांच्या या गद्यलेखनाने जागतिक स्तरावर समीक्षकांची प्रशंसा मिळवली.
2. ह्युमन अॅक्टस (२०१४)
ही कादंबरी ग्वांगजू उठावाशी संबंधित आहे, जिथे दक्षिण कोरियाच्या लोकशाही समर्थक आंदोलनावर शासनाने कठोर कारवाई केली. या कादंबरीत वेगवेगळ्या पात्रांच्या दृष्टीकोनातून या घटनांचे वर्णन आहे, ज्यात आंदोलनाचे मानसिक आणि शारीरिक परिणाम उलगडले जातात. ह्युमन अॅक्टस मध्ये इतिहासातील हिंसा आणि आघात यांचे चित्रण केले आहे. हॅन कांग यांच्या लेखनाने यापूर्वी कधीही जणू विस्मृतीत गेलेल्या घटनांना पुन्हा जिवंत केले. या कादंबरीला अनेक भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले आणि तिचे स्वागत जागतिक स्तरावर झाले. दक्षिण कोरियाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनेचे दु:खद पण प्रामाणिक चित्रण करण्यात आले.
3. द व्हाईट बुक (२०१६)
या पुस्तकात हॅन कांग आपल्या लहान बहिणीच्या मृत्यूवर चिंतन करतात. द व्हाईट बुक मध्ये जीवन, मृत्यू, आणि स्मृती यांची सूक्ष्मतेने मांडणी केली आहे. या कादंबरीत मृत्यूशी निगडित दुःख आणि त्याच्या परिणामांवर विचार मांडला आहे. पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणात ‘पांढरा’ या रंगाशी संबंधित गोष्टींचे प्रतीकात्मक वर्णन केले आहे. द व्हाईट बुक ला २०१८ च्या मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. या कादंबरीतील काव्यात्मक शैली आणि वैयक्तिक दुःख यांचे चित्रण समीक्षकांनी अत्यंत प्रशंसेने गौरवले.
4. ग्रीक लेसन्स (२०११)
ही कादंबरी एका व्यक्ती आणि तिच्या ग्रीक भाषेच्या शिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. एका भाषेच्या अध्ययनाच्या माध्यमातून दोन्ही पात्रांचे वैयक्तिक दुःख आणि एकाकीपण उलगडते. ग्रीक भाषेच्या अध्ययनातून मानवी जीवनातील संवाद, दुःख आणि अर्थाचा शोध घेण्याचा प्रयत्न हॅन कांग यांनी केला आहे. जरी या कादंबरीला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्रसिद्धी मिळाली नाही, तरी तिच्या सूक्ष्म दार्शनिक आणि भावनात्मक स्वरूपामुळे ती अनेक समीक्षकांनी गौरवली आहे.
5. युवर कोल्ड हॅंड्स (२००२)
या कादंबरीत एक शवविच्छेदन करणारा व्यक्ती मृतदेहांबद्दल अनिवार्य आकर्षण बाळगतो, ज्यामुळे त्याचा वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मानसिक संघर्ष उभा राहतो. हॅन कांग यांनी जीवन-मृत्यू आणि शरीराशी संबंधित संकल्पनांचा बारकाईने अभ्यास या कादंबरीत केला आहे. या कादंबरीत माणसाच्या मृत्यूशी असलेल्या नात्याचा गहन विचार मांडला आहे, ज्यामुळे ती एक महत्त्वाची साहित्यकृती ठरली आहे.
हॅन कांग यांची लेखनशैली काव्यात्मक आणि संवेदनशील असून त्याच वेळी ती हिंसक आणि उदासही आहे. मानवी शरीर, त्याचे अस्तित्व, त्याची मर्यादा, आणि त्यातील दुःख यावर त्यांचे लेखन केंद्रित आहे. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये समाजातील दबावांविरुद्ध लढणारे पात्र दिसतात, जसे की द वेजिटेरियन मधील नायिका आणि ह्युमन अॅक्टस मधील आंदोलनकर्ते.
हॅन कांग यांच्या साहित्याने जागतिक पातळीवर मानवी अनुभवांचे सखोल चित्रण केले आहे. त्यांच्या कादंबऱ्या ज्या सूक्ष्मतेने मानवी जीवनातील आघात, दुःख, आणि हिंसा यांचा विचार मांडतात, त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे स्थान मिळाले आहे. २०२४ सालचा नोबेल पुरस्कार त्यांना त्यांच्या काव्यात्मक आणि संवेदनशील गद्यलेखनासाठी मिळाल्यामुळे त्यांची जागतिक साहित्य क्षेत्रातील ओळख आणखी पक्की झाली आहे.
विश्वनाथ बिटे
सहाय्यक प्राध्यापक, इंग्रजी
शासकीय ज्ञान विज्ञान संस्था अमरावती